पुण्यात सध्या बांधकाम क्षेत्रात चांगलीच बूम आहे. अनेक जण चांगल्या फ्लॅटच्या शोधात असतात. प्रत्येकाची घर घेण्याची कारणे वेगवेगळी असतात. कोणी राहायसाठी, गुंतवणुक किंवा भविष्याची सोय म्हणून. कारण कुठलही असो, हा निर्णय खूप मोठा, महत्वाचा आणि खर्चिक असतो. काळजी घेतली नाही तर हा निर्णय आनंद देण्याऐवजी खूप मोठी डोकेदुखी तयार करून ठेवू शकतो.
मी पुण्यात फ्लॅट विकत घेण्यासाठी पाहायला सुरुवात केल्यानंतर मला अनेक धक्क्कादायक अनुभव मिळाले. साधारणतः पुण्यातले लोक अत्यंत चोखंदळ आणि काटेकोर म्हणून ओळखले जातात. पण जेंव्हा घर घ्यायची वेळ येते तेंव्हा हा स्वभाव कुठे जातो काय माहिती. बरेचसे लोक रोजची भाजी घेताना जेवढे बारकाईने पाहतात त्यापेक्षाही कमी फ्लॅट विकत घेताना काळजी घेतात. आपल्या मालमत्तेची कागदपत्रे, त्यांची गरज आणि आपली जबाबदारी ह्याबद्दल बरेचसे अज्ञान आणि गोंधळ आहे.
मी काही वकील नाही किंवा कुठल्याही प्रकारे बांधकाम क्षेत्राशी संबंधित नाही. परंतु मला जशीजशी माहिती होत गेली तशी हे सगळं फार भयानक वाटायला लागलं. पुण्यातले बरेचसे बिल्डर आणि एजंट सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी कसे खेळताहेत ते पाहून चीड येते. घर घेताना माणूस एवढा आनंदात असतो कि तो बऱ्याच वेळेला धोक्यांकडे दुर्लक्ष करतो. किंवा त्याला हे धोके माहीतच नसतात.
हा माझा प्रयत्न त्या लोकांना एका ठिकाणी थोडी माहिती मिळावी ह्यासाठी आहे.
प्रथमतः जेंव्हा घर पाहायला जाल तेंव्हा कागदपत्रांची खात्री झाल्याशिवाय कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. बरेचसे एजंट कागदपत्र दाखवण्याआधी टोकन मनी मागतात. ह्या त्यांच्या मागणीला बळी पडू नका. ठणकावून आधी कागदपत्र दाखवल्याशिवाय पैसे देणार नाही म्हणून सांगा. सर्व कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यावरच पैसे द्या. मोहात पडून निर्णय घेऊ नका.
खालील कागदपत्रे तपासून पहा :
जमिनीशी संबंधित कागदपत्रे
- जमिनीचा / प्लॉटचा नोंदणीकृत करारनामा (Registered Agreement) - बिल्डिंग ज्या जागेवर उभी आहे त्याच्या मालकीहक्का संबंधी माहिती ह्यात मिळते. हा बिल्डर आणि मूळ जमीन मालक ह्या दोघांमधे झालेला करार असतो. ह्यामध्ये प्लॉटचे टायटल क्लिअर आहे कि नाही ते चेक करा.
- नकाशा : प्लॉट असलेल्या परिसराचा महानगरपालिका मान्यता प्राप्त नकाशा. ह्यात प्लॉटच्या हद्दी, आकार, लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ पाहता येईल.
- इर-रीवोकेबल पॉवर ऑफ अँटर्नी (Irrevocable Power of Attorney) – पुण्या मध्ये ही कॉमन पद्धत आहे. जागा घेतल्यावर बिल्डर मूळ मालक कडून न परत फिरवता येणारी Power of Attorney करून घेतो. त्या योगे बिल्डरला जमीन मालकाच्या वतीने सही करण्याचा हक्क प्राप्त होतो. ह्या Power of Attorney च्या अधिकारातूनच बिल्डर सगळ्या कागदपत्रावर सह्या करतो.
- सर्च रिपोर्ट – वकिलांनी तयार केलेला जागा आणि मालमत्तेचा सर्च रेपोर्ट. ह्या मध्ये जागेचा गेल्या ५० वर्षाचा इतिहास लिहिलेला असतो.
- सात बाराचा उतारा – मला ह्याची आवश्यकता माहित नाही पण विचारायला काय जातय.
- अ-कृषक प्रमाणपत्र (NA certificate) – ही जमीन बगर शेती वापरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणारी परवानगी.
बांधकाम / इमारत संबंधी कागदपत्रे
- पुणे महानगरपालिका मान्यताप्राप्त बांधकाम नकाशा (Building Plan) : तुम्हाला जो बिल्डिंगचा नकाशा दाखवण्यात येत आहे तो मान्यताप्राप्त असल्याची खात्री करून घ्या. त्याच्या वर कॉर्पोरेशन चा शिक्का आणि सेक्शन इंजिनिअर ची सही आहे हे पाहून घ्या. बरेचसे लोक आर्किटेक्टचा शिक्का असलेला प्लानच सँक्शन प्लान म्हणून दाखवतात. नवीन माणसाला हे कळायला अवघड असते. जोपर्यंत त्याच्यावर कॉर्पोरेशन चा शिक्का आणि सेक्शन इंजिनिअर ची सही होत नाही तो पर्यंत त्याला सँक्शन प्लान म्हणत नाहीत.
- कमेंसमेंट सर्टिफिकेट – प्लान आणि इतर कागदपत्राची पूर्तता केल्या नंतर पुणे महानगरपालिका बांधकाम सुरु करण्याची परवानगी देते. ह्यालाच कमेंसमेंट सर्टिफिकेट असे म्हणतात.
- बॅंकेच ना-हरकत प्रमाणपत्र – बांधकाम खर्च करण्यासाठी बिल्डर बँकेकडून लोन घेत असतात. त्यावेळी ते पूर्ण बिल्डिंग बँकेकडे तारण म्हणून ठेवतात. अशावेळी फ्लॅट विकत घेण्यासाठी बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र लागते.
- बिल्डिंग पूर्णत्वाचा दाखला – सर्व बांधकाम पूर्ण झाल्या नंतर बिल्डरला त्याची तपासणी पुणे महानगरपालिका कडून करून घ्यावी लागते. तपासणी करून पुणे महानगरपालिका बिल्डिंग पूर्णत्वाचा दाखला देते. हे सर्टिफिकेट जरुरी असते आणि भविष्यात वेळोवेळी विविध संस्थांकडून ह्याची मागणी केली जाते.
- सोसायटी स्थापना – बांधकाम पूर्ण होऊन सर्व फ्लॅट विकल्या गेल्यानंतर बिल्डर सोसायटी स्थापन करून देतो. ही सोसायटी स्थापन होऊन तिचे रजिस्ट्रेशन झाले आहे किंवा नाही हे चेक करा. रजिस्ट्रेशन झाले नसल्यास सोसायटीला कायदेशीर मान्यता मिळत नाही.
- कनवेयंस डीड – सोसायटी स्थापन झाल्यानंतर पूर्ण बिल्डिंग आणि प्लॉटची मालकी बिल्डरने सोसायटीकडे हस्तांतरित करायची असते. ह्याला कनवेयंस डीड म्हणतात. ह्याशिवाय सोसायटी कायदेशीर मालक बनू शकत नाही व तिला हक्क प्राप्त होत नाहीत.
- सोसायटी उपविधी आणि नियम – ससोसायटीचे स्वतःचे नियम आणि उपविधी सर्व सभासदांवर बंधनकारक असतात. ते नीट वाचून पहिले पाहिजेत.
फ्लॅट व मालाकाविषयीची कागदपत्रे
- विक्री करारनामा – फ्लॅट बुक केल्यावर पहिल्यांदा हा करारनामा करावा लागतो.
- सेल डीड – हे खूप महत्वाचे डॉक्युमेंट असते. ह्या मुळे तुम्हाला कायदेशीर रित्या मालक म्हणून ओळख मिळते. अन्यथा तुम्ही मालक नसता.
- ताबा पत्र – जेव्हा तुम्ही फ्लॅटचा ताबा बिल्डरकडून घेता तेंव्हा तुम्हाला हे पत्र बिल्डर कडून मिळते.
- भोगवटा प्रमाण पत्र – हे एक अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट असते. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर महानगरपालिका तुम्हाला फ्लॅट वापरायला परवानगी देते. ह्याशिवाय तुम्हाला पाणी आणि ड्रेनेज चे कनेक्शन मिळू शकत नाही. वित्तीय संस्था सुद्धा ह्याची मागणी करतात.
- बॅंकेबरोबरच गृह कर्जासाठीचा करारनामा (House Loan Agreement)
- कर्ज थकबाकी विवरण पत्र (Loan Balance statement of Bank)
- मालमत्ता तारण मुक्त केल्याचे पत्र (Mortgage Release Order from Bank)
- सोसायटी बरोबरचे लीज डीड / करारनामा Lease Deed / Agreement with Society
- सोसायटीचे भाग प्रमाणपत्र Share Certificate of Society
- सोसायटी उपविधी आणि नियम By-laws and regulations of society
- सोसायटी कडून ना-हरकत प्रमाणपत्र NOC from Society
- राखीव कार पार्कींग Reserved Car Parking
- मालमत्ता कराची पावती Property tax receipt
- पाणीपट्टी बिल Water Bill
- वीज बिल MSEB Bill
- टेलिफोन बिल Telephone Bill


